‘कोव्हिशिल्ड’ऐवजी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीचा दक्षिण आफ्रिकेत वापर


जोह्वासबर्ग – ‘कोव्हिशिल्ड’ ही लस दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनावर प्रभावी न ठरल्यामुळे आफ्रिकेत आता ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीचा वापर केला जाणार आहे. सीरमने पाठवलेले १० लाख डोस परत घ्यावेत, असे आफ्रिकेने काल म्हटले होते.

दक्षिण आफ्रिकेत ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीने तयार केलेल्या लशीच्या ८० हजार कुप्या येणार असून त्याच्या सर्वसाधारण वापरास जगातील कुठल्याही देशाने अजून परवानगी दिलेली नाही, तरी देखील ती लस वापरली जाणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस पहिल्यांदा दिली जाईल, असे आरोग्य मंत्री झ्वेली खिझी यांनी सांगितले.

जॉन्सन अँड जॉन्सनची लस देखरेखीखाली दिली जाणार असून त्यातील चाचण्यात प्लासेबो म्हणजे औषधाचा अंश नसलेल्या घटकांचा वापर केला जाणार नाही. त्यानंतर पुढील काळात कोरोनाच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यात येईल. जॉन्सन अँड जॉन्सनची लस आतापर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले असून ती कोरोना प्रतिबंधक आहे.

लसीसाठी दक्षिण आफ्रिकेत ३ लाख ८० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून खिझी यांनी सांगितले, की १.२५ दशलक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांना दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा सलामच आहे. स्वत:चे रक्षण करतानाच त्यांनी लोकांचेही रक्षण केल्याचे, खिझी यांनी म्हटले आहे.

२० लसीकरण केंद्रे दक्षिण आफ्रिकेतील नऊ प्रांतात सुरू करण्यात आली असून पुढील दोन आठवडय़ात ८० हजार जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. लस देण्याचे काम १६४ व्यक्ती करणार असून तासाला सहा ते सात जणांना याप्रमाणे दिवसभरात ४८ जणांना लस दिली जाणार आहे.