आयपीएल लिलाव : दिल्ली कॅपिटल्सचा झाला स्टिव्ह स्मिथ


चेन्नई – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. २ कोटी २० लाख रुपयात दोन कोटी रुपयांची मूळ किंमत असलेल्या स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. सर्व संघांनी आयपीएलच्या लिलावाआधी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली होती. यात राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकले. त्याचा गेल्या हंगामातील खराब फॉर्म ही त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरली. राजस्थानने त्यामुळे अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली होती. स्मिथला यंदा दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे.

आरसीबीने लिलावात स्मिथवर मूळ किंमतीमध्ये बोली लावली होती, पण दिल्लीने दोन कोटी २० लाख रुपयांत स्मिथवर बोली लावली. अखेर दिल्लीने स्मिथला आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे. स्मिथ यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान संघाने स्मिथला १२ कोटी रुपयांत खरेदी केले होते. पण यंदा स्मिथची किंमत घसरली आहे.

गेल्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत दिल्लीच्या संघाने मजल मारली. पण मोक्याच्या क्षणी त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीच्या संघाकडे शिखर धवन, मार्कस स्टॉयनीस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल असे सहा फलंदाज आहेत. परंतु पृथ्वी शॉच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या संघात सलामीवीराची जागा एखाद्या अनुभवी खेळाडूला दिली जाऊ शकते. दिल्लीने शेवटच्या सामन्यांमध्ये स्टॉयनीसला सलामीला पाठवले होते, पण त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत स्टीव्ह स्मिथसारखा अनुभवी फलंदाज ताफ्यात दाखल झाला तर दिल्लीच्या संघाला स्थैर्य देण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.