आयपीएल लिलाव: चेन्नईच्या केदार जाधवला कोणत्याही संघाने घेतले नाही विकत


चेन्नई – आयपीएलच्या आगामी हंगामातील खेळाडूंचा लिलाव आज पार पडत असून चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या केदार जाधवला या लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अनसोल्ड प्लेयर्सच्या म्हणजेच लिलावामध्ये कोणीही बोली न लावलेल्या खेळाडूंच्या यादीत केदार जाधवचा समावेश झाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वात आधी प्लेऑफ्समधून बाहेर पडलेल्या चेन्नईच्या संघाने काही सामने अगदी थोड्या फरकाने गमावले. केदारच्या संथ खेळीमुळे यापैकी काही सामन्यांमध्ये हा पराभव झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. केदारसंदर्भातील चर्चा चेन्नईच्या सामन्यांनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर आवर्जून पहायला मिळायची. टी-२० सारख्या जलद फॉरमॅटमध्ये अशाप्रकारचा संथपणा चेन्नईसारख्या टीममधील खेळाडूने दाखवणे योग्य नसल्याची टीकाही त्याच्या खेळासंदर्भात करण्यात आली. मागील हंगामातील याच टीकेचा परिणाम आजच्या लिलावामध्ये पाहायला मिळाला. केदार आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर अनसोल्ड खेळाडू ठरल्याचे ट्विट करण्यात आल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनीच त्याच्यावर आपल्या संघाने बोली न लावल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.