माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या प्रक्रियेवर केली टीका


मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा दिसू लागल्याचे सांगितले जात असतानाच या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. आपल्याच आमदारांना हे सरकार घाबरत असल्याचे दिसत आहे. आपल्याच आमदारांना एवढे घाबरणारे सरकार मी पहिल्यांदाच पाहत असल्याचे फडणवीस म्हणाले.

प्रचंड बहुमत सरकारकडे असताना हे सरकार का घाबरत आहे. आपल्याच आमदारांना एवढे घाबरणारे सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे. हे घाबरट सरकार असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमावलीनुसार राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते. पण गेल्या काही दिवसांमधील चर्चा पाहिल्या, तर हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचे दिसत आहे. आपला उमेदवार पडतो की काय, याचीच सरकारला जास्त भिती आहे. पण चांगले आहे. यामुळे आमचे मनोरंजन होत आहे आणि आमदारांचे भले होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलनासंदर्भात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी केलेल्या ट्वीटवरून नाना पटोलेंनी चित्रपटाचे शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहित आहे की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचेच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचे नाव त्यांनाही कमवायचे असल्यामुळे त्यांना वाटते की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते? येथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झाल आहात, असे फडणवीस यावेळी म्हणाले.