अजित पवारांनी पूजा चव्हाण प्रकरणी मांडली संजय राठोड यांची बाजू


मुंबई – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण सध्या तापे आहे. एकीकडे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची भाजप वारंवार मागणी करत असताना दुसरीकडे वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत शिवसेना आहे. या विषयावर अद्यापही संजय राठोड यांनी मौन बाळगले असून या प्रकरणी त्यांचे नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले असून एकाप्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.

ती व्यक्ती आताच्या घडीला निराधार आहे, ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीत मागेदेखील अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचे किंवा त्या पदावरुन हटवायचे हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

संजय राठोड या प्रकरणी खुलासा करणार असल्याची माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण जे आरोप त्यांच्यावर झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे, असे आम्ही सांगितले आहे. पण चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचे नाव घेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणे फार उचित नसल्याचेही ते म्हणाले आहेत.