विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी येण्याची शक्यता


नवी दिल्ली – चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांची मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर या मालिकेचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. पण टीम इंडिया तिसर्‍या कसोटीपूर्वी मोठ्या अडचणीत आल्याचे दिसत आहे. कर्णधार विराट कोहलीवर तिसऱ्या कसोटीत बंदीचा धोका असल्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी कर्णधार विराट कोहलीने पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. कर्णधार विराट कोहली पंचांशी बराच वेळ निर्णयावरुन वाद घालत होता. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता.

आयसीसीच्या नियमांनुसार पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवण्यासाठी खेळाडूंवर लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 शुल्क आकारले जाते. या शुल्कामुळे, खेळाडूला 1 ते 4 दरम्यान डिमिरेट गुण दिले जातात. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घातली जाते.

विराट कोहलीला 2019 च्या अखेरीस आधीपासूनच दोन डिमरेट गुण मिळाले आहेत. पंचांच्या चेन्नईत झालेल्या निर्णयावर नाराजीमुळे विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमरेट गुण मिळाले तर त्याच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला अहमदाबाद कसोटीतून बाहेर पडावे लागू शकते.