‘या’ राज्याने पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त ‘करून दाखवले’


नवी दिल्ली – सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे विषय झाले आहेत. त्यातही नोकरदार आणि सामान्यांसाठी हा महिन्याचा अर्थसंकल्प तर शिलकीचा की तुटीचा? हे ठरवणाराच प्रश्न आहे! विशेषत: पेट्रोल आणि डिझेलमुळे गेल्या महिन्याभरात सामान्यांना जेवणापेक्षाही पेट्रोलवर जास्त खर्च करावा लागत असल्यामुळे या पेट्रोलने डोळ्यात पाणी आणल्याचा त्रागा सगळेच करताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या महिन्याभरात तब्बल १० वेळा वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांवरही सामान्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी असताना पेट्रोल-डिझेलच्या किंमती भारतातील एका राज्याने अनुक्रमे ५ आणि ७ रुपयांनी कमी करण्याची कमाल करून दाखवली आहे.

भारतातील पेट्रोलचे आजचे सरासरी दर तब्बल ९२ ते ९५ रुपयांच्या घरात आहेत. तर डिझेलचे सरासरी दर ८७ ते ९० रुपयांच्या घरात आहेत. पण पेट्रोल इतर राज्यांपेक्षा साधारण ५ रुपये कमी म्हणजेच ८५.८६ रुपये दराने, तर डिझेल ७ रुपयांनी कमी म्हणजेच ७९.१३ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करण्याची घोषणा मेघालयने केली आहे. दररोज भारतभर पेट्रोलचे भाव वाढत असताना मेघालयने उलट ते कमी केले आहेत.

मेघालयमधील वाहतूकदारांच्या संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत, तर हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता. मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरे़ड संगमा यांनी या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून यासाठी लावण्यात येणारा व्हॅट कमी करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये पेट्रोलवर लावण्यात येणारा ३१.६२ टक्के व्हॅट २० टक्क्यापर्यंत किंवा १५ रुपयांनी यातील जी रक्कम जास्त असेल, ती कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेलवर लावण्यात आलेला येणारा २२.९५ टक्के व्हॅट १२ टक्क्यांवर किंवा ९ रुपयांनी, यातील जी रक्कम जास्त भरेल ती कमी करण्याचा समावेश आहे.

दरम्यान, आता भारतातील इतर राज्यांवर देखील मेघालयने किंमती कमी केल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणून त्या कमी करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले दिवंगत पी. ए. संगमा यांचे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरेड संगमा हे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांनी प्रचार मोहिमा देखील राबवल्या आहेत. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा आता महाराष्ट्राच्या सत्तेत देखील वाटा असल्यामुळे महाराष्ट्रात देखील किंमती कमी होण्याच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या आहेत.