दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीची कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज फाफ डु प्लेसीने निवृत्ती स्वीकारली आहे. आज 17 फेब्रुवारीला याबद्दलची घोषणा डुप्लेसीने केली. कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक नव्हती. पाकिस्तान विरोधातील मालिकेत देखील फाफ डुप्लेसीची कामगिरी चांगली राहिली नव्हती. यामुळे अखेर फाफ डु प्लेसीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेचे फाफ डू प्लेसीने 69 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने त्यामध्ये 4 हजार धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये फाफ डू प्लेसीने पदार्पण केले होते. फाफ डू प्लेसीने कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकेसाठी डू प्लेसीने कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके केली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधील आपल्या खराब फॉर्ममुळे फाफ डू प्लेसी चिंतीत होता. पाकिस्तान विरोधातील मालिकेत त्याला फक्त 55 धावा करता आल्या होत्या. पाकिस्तान विरोधातील मालिकेत फाफ डू प्लेसीने दोन कसोटी सामने खेळले. त्यामध्ये अनुक्रमे 10,23,17 आणि 5 धावा त्याने केल्या. पाकिस्तान विरोधातील मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने पराभव झाला होता.