पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचे गूढ आणखी वाढले!


यवतमाळ: यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव पुणे येथील पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणात चर्चेत आले असून पुणे पोलिसांचे पथक त्या अनुषंगाने यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. मेडिलकच्या प्रसूती वार्ड क्र. ३ मध्ये ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी दाखल झालेली ती युवती नेमकी कोण याचा उलगडा झालेला नाही. नांदेड जिल्ह्यातील असा दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नोंदविण्यात आला आहे. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तिच्यावर उपचार करण्यात आले. नंतर तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. तिला पहाटे दाखल करून उपचार करणे डॉक्टर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासातच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोड आहे.

पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर या सर्व घडामोडी उजेडात आल्यामुळे या सर्व घटनाक्रमाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यवतमाळ मेडिकलमध्ये पूजा चव्हाण हिलाच नाव बदलवून दाखल केल्याचेही बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांचे पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले.

येथील अधिष्ठातांना पूजाच्या मृत्यू प्रकरणात सूचना पत्र देऊन पोलिसांनी १ ते ६ फेब्रुवारी दरम्यानची माहिती मागितली आहे. तशी नोंद त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली होती. युनिट २ च्या डॉक्टरांचे नाव त्या युवतीच्या गर्भपात प्रकरणात माध्यमात झळकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण नव्हे तर पूजा अरुण राठोड नावाची तरुणी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.