छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने ३९१ झाडे लावू या; अमोल कोल्हेंची साद


मुंबई: यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कोणतीही मिरवणूक शिवजयंतीला काढता येणार नसल्याचे सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये, यासाठी कलम १४४ लागू केला आहे.

दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनेक शिवप्रेमी जमत असतात. शिवनेरी किल्ल्यावर राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त जातात. पण सरकारने यंदा कोरोनामुळे किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केल्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना शाश्वत मानवंदना देण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना साद घातली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या यंदा ३९१ व्या जयंतीच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शाश्वत देणगी दिली, ती म्हणजे स्वराज्य. त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक गावाने ३९१ झाडे लावू या, ती जगवू या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी तरुणांना केले आहे.

वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. अमोल कोल्हे यांनी याच संकल्पाची व्याप्ती वाढवत गावोगावच्या ग्रामपंचायतींना ३९१ देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.