लोकल प्रवास दरम्यान मास्क न वापरणाऱ्यांविरोधात होणार कारवाई


मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबईतील लोकल सर्ववसामान्यांसाठी सुरु झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आल्यामुळे बृह्नमुंबई महानगरपालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील लॉकडाऊनाच्या नियमांमध्ये शिथिल आणल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने त्यास वेळीच आवर घालण्यासाठी नव्याने आढावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याअनुषंगाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी बृह्नमुंबई महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकलमध्ये मार्शल नियुक्त केले जाणार आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले की, प्रत्येक मार्गिकेवर एजन्सीच्या माध्यमातून 100 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. दोन दिवसांत ही कारवाई सुरू होणार असून त्यात मास्क न वापरल्यास 200 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर सुरुवातीपासूनच कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 15 लाख मुंबईकरांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्ययाकडून 30 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.