मुंबईतील हे परिसर आहेत नवे कोरोना HotSpots


मुंबई : एकीकडे देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. 14 फेब्रुवारीला मुंबईत महिन्याभरानंतर पहिल्यांदाच सहाशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे मुंबईत आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची आणि लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे

आतापर्यंत मुंबईत एकूण तीन लाख 14 हजार 569 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. अॅक्टिव्ह म्हणजेच रुग्णालयात दाखल असलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांची 15 फेब्रुवारीपर्यंतची संख्या 5531 एवढी आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 94 टक्के असून, नवे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 455 दिवस झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबई जिल्ह्यात 85 कंटेन्मेंट झोन असून, एकूण 992 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

धारावीला याआधी कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. त्यानंतर आता मुंबईतील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.

  • 14 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट खालीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या बोरीवलीत असून, ती 408 आहे. तसेच, मुंबईतील कोरोनाबाधितांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू बोरीवलीतच नोंदवले गेले असून, त्यांची संख्या 643 एवढी आहे.
  • बोरीवलीनंतर केडब्ल्यू वॉर्डचा क्रमांक लागतो. यात अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातल्या अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 378 असून, येथे आतापर्यंत 573 मृत्यूंची नोंद झाली आहे. संक्रमण रोखण्यासाठी या परिसरातील 100 इमारती रविवारी (14 फेब्रुवारी) सील करण्यात आल्या आहेत.
  • 345 कोरोनाबाधितांवर कांदिवली आणि चारकोपमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 552 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • 338 कोरोनाबाधितांवर पी-नॉर्थ वॉर्डमधील मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ या परिसरात सध्या उपचार सुरू आहेत.
  • 292 कोरोनाबाधित मुलुंडमध्ये सध्या उपचार घेत असून, आतापर्यंत 370 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुलुंडमध्ये सील केलेल्या इमारतींची सर्वाधिक संख्याही आहे. रविवारपर्यंत येथील सील केलेल्या इमारतींची संख्या 202वर पोहोचली होती. 0.25 टक्के एवढा या वॉर्डमध्ये नवे रुग्ण वाढण्याचा दर आहे.
  • एन वॉर्डमधील घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगरमध्ये 162 इमारती सील करण्यात आल्या आहेत. वॉर्डमधील 14 झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये कन्टेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. या वॉर्डमध्ये 281 रुग्णांवर उपचार सुरू असून, 594 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • वॉर्ड एसमधील भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील 10 झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेनमेंट झोनमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये 281 अॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत 720 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मुंबईत सर्वाधिक ‘वॉर्ड एम/वेस्ट’मधील चेंबूर, सिंधी सोसायटी, छेडा नगर आणि टिळकनगर परिसरात रुग्णवाढीचा दर आहे.