ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये टीम इंडियाची मोठी झेप


चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 317 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाने पराभव केला. यासह टीम इंडियाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाला या विजयाचा दुहेरी फायदा झाला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली. तर मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या रॅकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या रॅकिंगमध्ये टीम इंडियाने मोठी झेप घेतली आहे. भारताला या मोठ्या अंतराने विजय मिळवल्याने 2 स्थानांचा फायदा झाला आहे. टीम इंडियाने यासह चौथ्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर इंग्लंडला या पराभवामुळे मोठा धक्का लागला आहे. दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर इंग्लंडची घसरण झाली आहे. एकूणच या सामन्याच्या निकालामुळे टीम इंडियाला फायदा तर इंग्लंडला तोटा झाला आहे.

दरम्यान या फेरबदलामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्साठीची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी एकाच संघाला संधी आहे. तर स्पर्धेत टीम इंडिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया असल्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात कोण खेळणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.


1 आणि टीम 3 अशी रंगतदार स्थिती असल्याने प्रत्येक संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटींमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. किंवा 1 सामना अनिर्णित राखून एका मॅचमध्ये विजय मिळवावा लागेल. तर इंग्लंडला अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी उर्वरित 2 सामने जिंकणे बंधनकारक असणार आहे.

तर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेवर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य हे अवलंबून असणार आहे. या मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांपैकी प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकल्यास किंवा दोन्ही सामने ड्रॉ व्हावे, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाची असणार आहे किंवा एक सामना बरोबरीत राखून दुसरा सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियासाठी आशा कायम राहतील. एकूणच ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी ही अगदी जर तरची आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना हा अहमदाबदमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा तिसरा सामना डे नाईट असणार आहे.