शिवसेनेच्या लेटरहेडच्या माध्यमातून नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी


नवी दिल्लीः लोकसभेत शिवसेनेच्या विरोधात बोलल्यामुळे महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची सध्या चर्चा आहे. विशेष म्हणजे ही धमकी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या लेटरहेडवरून दिली आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

१३ फेब्रुवारी २०२१ ची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एफआयआरची प्रत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील ८ फेब्रुवारीला माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र देऊन अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच मला आणि माझ्या पतीला आठ दिवसांत जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ल्याची धमकी दिली गेल्याचे नवनीत कौर राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी पाठवले आहे. लोकशाहीसाठी असे शब्द मुळीच चांगले नाहीत. अश्लील शब्दांचा वापर आपल्यासंबंधी करून धमकी देणारे फोनही केले जात आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा असल्याचे नवनीत कौर राणा यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.