ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांचे चौकशीचे आश्वासन


सिडनी – ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने संसदेत आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेचा माफी मागितली असून कशा पद्दतीने सरकारी कामकाज चालते यासंबधी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात मार्च २०१९ मध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सरकारी पक्षासाठी बलात्कार करणारा आरोपीदेखील काम करतो, असे महिलेने सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांना याबाबत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपण पोलिसांसोबत याबाबतीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चर्चा केली होती. पण करिअरची चिंता असल्याने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. एप्रिल २०१९ मध्ये पोलिसांनीही तक्रारदार महिलेसोबत संभाषण झाल्याची आणि तिने तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

आपण याबाबतची माहिती संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयामधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दिल्याचेही सांगितले आहे. यानंतर आपल्याला कार्यालयातील एका बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आणि तिथे छळ करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीबद्दल आपल्याला सांगण्यात आल्याचे रेनॉल्ड्स यांनी म्हटले आहे. मात्र यावेळी त्यांनी पोलीस तक्रार करु नये, यासाठी दबाव टाकल्याचा आरोप फेटाळला आहे.

दरम्यान मंगळवारी महिलेची पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी माफी मागत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. हा असा प्रकार व्हायला नको होता, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो, असं पंतप्रधानांनी पत्रकारांना सांगितले. कामाच्या ठिकाणी महिला जास्तीत जास्त सुरक्षित राहाव्यात याची मी खात्री करत असल्याचेही त्यांनी सांगितले.