गोध्रा जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक


नवी दिल्ली – तब्बल १९ वर्षानंतर गोध्रा जळीतकांड प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. १९ वर्षांनी देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या हत्याकांडामधील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. रफीफ हुसैन भटुक असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी गोध्रा शहरामधून अटक केली आहे.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावण्यात आली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी हे कारसेवक होते. या घटनेत ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या डब्याला ज्या जमावाने आग लावली होती त्यामध्ये रफीकचाही समावेश होता. या ट्रेनच्या डब्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर पेट्रोल बॉम्ब टाकून त्यानेच आधी या डब्याला आग लावल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.

यासंदर्भात पंचमहल जिल्हा पोलिसांच्या अधीक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेनच्या डब्ब्यावर हल्ला करणाऱ्या टोळीमध्ये ५१ वर्षीय भटुक हा होता. भटुक या घटनेनंतर मागील १९ वर्षांपासून फरार होता. पोलीस भटुकचा मागावर होते. लीना यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई केली. पोलिसांना गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या एका घरामध्ये भटुक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी भटुकला ताब्यात घेतल्याचे लीना पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.

भटुकचा गोध्रा जळीतकांड रचणाऱ्या गटात सहभाग होता. भटुक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जमा झालेल्या गर्दीमधील लोकांची माथी भडकावण्याचे आणि त्यांनंतर ट्रेनचा डब्बा जाळण्यासाठी पेट्रोल पुरवण्याचे काम केले होते. या घटनेनंतर तपास सुरु झाला. त्यानंतर तपासामध्ये भटुकचे नाव समोर आल्यानंतर त्याने गोध्रामधून पळ काढला. हत्या, दंगल पसरवणे आणि इतरही अनेक आरोप भटुकविरोधात असल्याचे लीना यांनी सांगितले आहे. गोध्रा हत्याकांड हे गुजरातमधील दंगलीसाठी कारणीभूत ठरले होते.

रेल्वे स्थानकाजवळच मजूर म्हणून मागील १९ वर्षांपासून फरार असणारा भटुक काम करायचा, अशी माहितीही पोलिसांनी दिली. गोध्रा प्रकरणानंतर दिल्ला गेलाला भटुक दिल्ली रेल्वे स्थानकाजवळच असणाऱ्या एका बांधकामाच्या ठिकाणा मजूर म्हणून काम करु लागला. तसेच लहान मोठ्या वस्तू बनवून भटुक त्या घरोघरी जाऊन विकायचा. ग्रोधा जळीतकांड घडण्याआधी भटुक सुल्तान पालिया परिसरामध्ये रहायचा. त्यानंतर तो दुसऱ्या जागी रहायला गेला होता.