
मुंबई – राज्यातील राजकारण सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये झाडल्या जात आहेत. भाजपने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात घेतले असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे नवे राजकीय संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
गेल्या काही दिवसांपासून विरोधक पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी आक्रमक झाले होते. त्यातच आपला राजीनामा संजय राठोड यांनी सोपवला असल्याची चर्चा रंगली आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शिवसेनेकडून देण्यात आलेली नाही.
एकीकडे कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिलेले असताना वनमंत्री संजय राठोड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. सोशल मीडियामध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.
कोणाचेही नाव घेणे फडणवीस यांनी टाळले असताना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी रात्री संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या सगळ्या तपशिलांचा रोख जातो. पोलिसांनी स्वत: (स्यु-मोटोतंर्गत) तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
