पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा! इंग्लंडवर भारताचा दणदणीत विजय


चेन्नई – इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी आर.अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर अक्षरशः लोटांगण घातले. १६४ धावांपर्यंत ४८२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ मजल मारु शकला. दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने ३१३ धावांनी जिंकला. भारतीय संघाने या विजयासाह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पदार्पणवीर अक्षर पटेलने पाच बळी घेत दुसऱ्या डावांत इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले.

विस्फोटक सलामी फलंदाज रोहित शर्माची शतकी खेळी, आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात निर्वादित वर्चस्व गाजवले. पहिल्या डावांत रोहित शर्माच्या १६१ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं ३२९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने पाच बळी घेतले तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत सामन्यात ८ बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना अश्विनने शतकी खेळी केली होती.

पदार्पणवीर अक्षर पटेलने दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. अक्षर पटेलने पहिल्या डावांत दोन आणि दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले आहेत. पहिल्या डावात म्हणावी तशी संघी न मिळालेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या डावात दोन बळीवर समाधान मानवे लागले. पहिल्या डावांत ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधारा दुसऱ्या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळीही करता आली नाही.