एका महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत निवडणूक लढवली यात कोणता पुरुषार्थ आहे?


सांगली – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सुरु असलेली शाब्दिक चकमक वाढत चालली आहे, माझ्याशिवाय शरद पवारांना करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता, त्यावरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, एका महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर आयत्या बिळावर नागोबासारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापे काढणे बंद करावे. आपण विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही, पण चुकीचे बोलणार्‍यांचे इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला

तसेच पक्ष कसा टिकवायचा याची चिंता चंद्रकांत पाटील यांना पडली असल्यामुळे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यातील एका अतिशय चांगले काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल करत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका केली. मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला. त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले.