२२ वर्षांची विद्यार्थिनी जर देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे


नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे कथित ‘टूलकिट’ सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आता दिशाच्या अटकेनंतर राजकारण तापायला सुरूवात झाली असून दिशा रवीच्या अटकेचा काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी विरोध केला आहे. भारत मूर्खपणाचे नाट्यगृह बनत चालले असल्याचे म्हणत चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेवरुन मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.


२२ वर्षांची विद्यार्थिनी जर देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे, भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांपेक्षाही धोकादायक शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचे एक टूलकिट झाले असल्याची खरमरीत टीका चिदंबरम यांनी ट्विटरद्वारे केली आहे.


भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत दिल्ली पोलिस, ही खेदाची बाब असून दिशा रवीच्या अटकेचा मी तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो, असे म्हणत चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेचा तीव्र विरोध केला आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.