आजपासून टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल


मुंबई : रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोल प्लाझावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांना आता फक्त फास्टॅगमधूनच टोल भरावा लागणार आहे. फास्टॅग ज्यांच्याकडे नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला होता. नंतर त्याला दीड महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण आता फास्टॅगच्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकलले जाणार नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केल्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद करण्यात आल्या आहेत. कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

आपण अद्याप आपल्या वाहनावर जर फास्टॅग स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. फास्टॅग पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून खरेदी केले जाऊ शकते. तसेच, फास्टॅग देशातील 23 बँकांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही फास्टॅगची विक्री केली जात आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या (आयएचएमसीएल) माध्यमातूनही फास्टॅगची विक्री केली जात आहे.

किमान शिल्लक फास्टॅग खात्यात ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे फास्टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ प्रवासी वाहनांसाठी फास्टॅगचे नियम बदलण्यात आले आहेत. अद्याप जुना नियम व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. फास्टॅगच्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसे की कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरचे फास्टॅग रिचार्ज नसल्यामुळे वाहनांना टोलवर थांबावे लागत होते. ज्यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता होती. पण आता असे होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.