टूलकिट प्रकरणी फरार निकिता जेकब विरुद्ध दिल्ली पोलिसांनी काढले वॉरंट


नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिट विकसित करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात झाली असून आता दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात फरार असलेल्या निकिता जेकब विरोधात वॉरंट जारी केले आहे. दिल्ली पोलिसांनी याआधी पर्यावरणवादी दिशा रवी हिला टूलकिटचे संपादन केल्याप्रकरणी अटक केली. ५ दिवसांची पोलीस कोठडी दिशाला सुनावण्यात आली.

१० फेब्रुवारी रोजी मुंबईत वकील असलेल्या निकिता जेकब हिच्या घरावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकला. निकिताने यावेळी तपासात सहकार्य करेन असे आश्वासन दिले. निकिताला याच कारणामुळे पोलिसांनी अटक करणे टाळले. यानंतर संधी साधून निकिता फरार झाली. निकिता अद्याप सापडलेली नाही. निकिताचा शोध दिल्ली पोलिसांनी सुरू केला असून तिच्याविरोधात वॉरंट काढले आहे.

खलिस्तान समर्थकांच्या संपर्कात निकिता जेकब होती. निकिताने टूलकिटसाठी दिशा आणि अन्य काही जमातींची मदत घेतली. टूलकिट संदर्भात वकील असलेली निकिता खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा संस्थापक एमओ धालिवाल याच्याशी चर्चा करत होती. पुनीत नावाच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून निकिता धालिवालच्या संपर्कात आली होती.

ग्रेटा थनबर्ग हिच्याशी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशाची ओळख आहे. या ओळखीचा फायदा करुन घेतला तर मोदी सरकार विरोधात जगभर वातावरण तापवणे सोपे होईल, असे मत निकिताने व्यक्त केले. यानंतर हिरवा कंदिल धालिवालकडून मिळताच निकिताने दिशाला सोबत घेतले. निकिता आणि दिशा या दोघीजणी टूलकिट प्रकरणाशी संबंधित आहेत. पोलिसांनी छापा टाकला म्हणजे लवकरच अटक होणार आणि अडचणी वाढणार याचा अंदाज येताच निकिता फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.