हरयाणाच्या कृषिमंत्र्यांचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य


हरयाणा – आतापर्यंत 200 शेतकऱ्यांचा दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मृत्यु झाला असून हरयाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल यांनी या शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त वक्तव्य करत शेतकरी आंदोलनाचा अपमान केला आहे.

शेतकरी घरी असते तरी ते मेले असते, त्यांच्या इच्छेनुसारच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे खेदजनक वक्तव्य कृषिमंत्री जेपी दलाल यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर याप्रकरणी त्यांनी माफी मागत आपल्या वक्तव्यांचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण दिले.

गेल्या 81 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 200 शेतकऱ्यांचा या आंदोलनात मृत्यू झाला असून या शेतकऱ्यांना देशभरातून श्रद्धाजंली वाहण्यात येत आहे. तर दुसरीकडे हरयाणाचे कृषिमंत्री जेपी दलाल यांनी या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे.

जे शेतकरी आज घरी आहेत. त्यांचा मृत्यू का झाला नाही ? हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक जण मेले आहेत, तर काही जणांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य जेपी दलाल यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

एसी आणि कुलरची व्यवस्था उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकण्यासाठी करावी लागणार आहे. सरकारने यासाठी आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. सरकारने जर विजेचा पुरवठा केला नाही तर जनरेटरची व्यवस्था करावी लागेल असे देखील टिकैत यांनी यावेळी सांगितले. लोकांनी जनरेटर आणि डिझेलसाठी मदत करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

येत्या 18 फेब्रुवारी रोजी किसान संयुक्त मोर्चाकडून देशव्यापी रेल रोकोची हाक देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी देखील या आंदोलनासाठी आपली तयारी सुरू केली असून दिल्लीच्या सोनीपत रेल्वे स्थानकाजवळ राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.