तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड ३ बाद ५३, विजयासाठी ४२९ धावांची गरज


चेन्नई – भारतीय संघाने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. भारताचा दुसरा डाव रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर २८६ धावांवर संपुष्टात आला. भारताचे वरच्या फळीतील फलंदाज गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर स्वस्तात माघारी परतले. पण इंग्लंडच्या फिरकीपटूंचा कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी धैर्याने सामना केला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून विजयासाठी इंग्लंडला ४२९ धावांची गरज आहे तर ७ गड्यांची भारताला आवश्यकता आहे.