पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आवाज उठवल्यामुळे धमकावले जात असल्याचा भाजप नेत्याचा आरोप


मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणामुळे राज्यातील राजकारण सध्या ठवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथमधील पूजा चव्हाण आत्महत्येला जबाबदार धरले जात असल्यामुळे सध्या विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राठोड यांच्या नावाचा थेट उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धारेवर धरल्यानंतर याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही आवाज उठवला. परंतु अतुल भातखळकर यांनी आपल्याला याप्रकरणी आवाज उठवल्याने धमकावले जात असल्याचा आरोप केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीतील चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र पाठवले होते. परंतु ठाकरे सरकारवर आता अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. भातखळकरांनी ट्विट करत म्हंटले की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येत आहेत, ही झुंडशाही ठाकरे सरकार आल्यापासून बळावल्याचा आरोप केला आहे.


सरकार प्रायोजित गुंडांनी मी धमक्यांनी बधणारा नाही हे लक्षात घ्यावे, असा इशारा भातखळकरांना दिला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना अतुल भातखळकरांनी पत्र लिहिले होते. त्यांनी या पत्रात, या प्रकरणी शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव पुढे आले आहे, या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतरच धमक्यांचे फोन मला येत असल्याचे भातखळकर म्हणाले.