शिवजयंती साजरी करण्याबाबत ‘भाजप’पेक्षा वेगळी उदयनराजेंची भूमिका


सातारा – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध आणले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाची अस्मिता असल्यामुळे त्यांची जयंती जल्लोषात साजरी झाली पाहिजे, त्याच वेळी राज्यातीलव नागरिकांचीही काळजी घेणे, ही शासनाची व आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केले.

कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. गेले काही महिने विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना आणखी एक मुद्दा मिळाला आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि मनसेने सरकारवर टीका केलेली असतानाच खा. उदयनराजे भोसले यांनी वेगळे मत मांडले आहे.

खा. उदयनराजे ग्रेड सेपरेटरच्या हस्तांतरणप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर म्हणाले, कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळचे लोक, कुटुबातील घटक, नातेवाईक गमावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांची जयंती साजरी झालीच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या लोकांची काळजी घेणे, ही शासनाची आणि आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी रयतेला नेहमी तळहातावरील फोडाप्रमाणे जपले होते. त्यामुळे शिवजयंती जरूर साजरी करा, पण स्वतःची काळजीसुद्धा घ्या.

नुकतीच नवी दिल्लीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यासंदर्भात विचारले असता, चर्चेतून मार्ग निघेल, अशी खात्री मला आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे तब्बल 76 कोटी खर्च करून उभारलेल्या ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण करण्यात आले. ग्रेड सेपरेटरची फाइल राहुल अहिरे यांनी अभिजित बापट यांच्याकडे दिली. ग्रेड सेपरेरटर अत्यंत देखणा झाला आहे. याशिवाय शिवतीर्थाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून अडीच कोटी रुपये दिले जाणार असल्याचे उदयनराजे म्हणाले. सातारा पालिकेकडे रविवारी सातारा येथील पोवई नाक्‍यावर उभारण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण करण्यात आले. उदयनराजे त्यावेळी बोलत होते.