रोहित पवारांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणावर मांडली कणखर भूमिका


पुणे – राज्याचे राजकारण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चांगलेच तापले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव यामध्ये समोर येत असल्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने आक्रमक पवित्रा घेत लावून धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण या गोष्टीचे राजकारण करू नये. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असून जे सत्य आहे ते समोर येईल, पण पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावर अन्याय होता कामा नये, असे रोहित पवार यांनी म्हटले.

रोहित पवारांनी यावेळी कणखर भूमिका घेत, व्यक्ती कितीही मोठी असेल तरीही या प्रकरणात ती जबाबदार असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, अशी भूमिका घेतली. मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आमदार रोहित पवार यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.