जावई हर्षवर्धन जाधव यांच्या प्रश्नावर संतापले रावसाहेब दानवे, म्हणाले…


औरंगाबाद : केंद्रीय मंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. दानवेंना त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल त्यावेळी प्रश्न विचारण्यात आला. दानवे यावर चांगलेच संतापले व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्यांनी ‘जावयाला जाऊन भेट’ असा तिरकस सल्ला दिला.

गेल्या काही काळापासून रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात संघर्ष सुरू आहे. दानवे यांनीच पुण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचे नुकतेच जाधव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दानवे यांचे राजकारण संपुष्ठात आणण्याचा दावाही जाधव यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकारणात जाधव सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घरगुती कलहापासून या वादाची सुरुवात झाली. दानवे यांची मुलगी आणि हर्षवर्धन यांची पत्नी यांनी सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार देत, जाधव यांच्याकडून मारहाण होत असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर संजना यांच्या विरुद्ध जाधव यांच्या आईंनी देखील पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कामानिमित्त जाधव पुण्याला गेले असता, त्यांनी वृद्धाला मारहाण केली होती. त्याची तक्रार दाखल होताच त्यांना अटक करण्यात अली होती. अथक परिश्रमानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला होता. तुरुंगातून बाहेर येताच सासरे दानवे यांचे राजकारण संपुष्टात आणणार असल्याचे सांगितले होते.

दानवे यांना याच विषयावर औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देण्याऐवजी तेच पत्रकारांवर भडकले. हर्षवर्धन जाधवांच्या प्रश्नावर त्यांनी फक्त जावयाला जाऊन भेटा एवढे तीनच शब्द बोलत विषय बदलत उत्तर देणे टाळले. त्यांच्या या उत्तरामुळे मात्र दानवेंच्या मनात जावयाबद्दल नेमक्या कोणत्या भावना आहेत हे समजले.