उद्या सुरू होणार नाहीत मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये


मुंबई : उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील महाविद्यालये सुरु होणार आहेत. पण उद्या मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय सुरू होणार नाहीत. स्थानिक प्रशासनाकडून महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे. एकीकडे 15 फेब्रुवारीपासून राज्यभरातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्याबाबत 3 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे.

जरी राज्य सरकारने विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय दिला असला, तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ, असे सांगण्यात आला आहे.

प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून राज्य शासनाच्या 3 फेब्रुवारीपासून कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयात त्या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. असे असताना देखील कॉलेज महाविद्यालय सुरू करण्याबाबत मुंबई विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडल्याचे समोर आले आहे. बुक्टोने याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले होते.