इंग्लंडला अश्विनचा दणका; दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ भक्कम स्थितीत


चेन्नई – भारताने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ५४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्यानंतर अवघ्या १३४ धावांमध्ये इंग्लंडचा डाव आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावात भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.

भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची भारताने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) दोघांना अश्विनने बाद केले. तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) आपली पहिली कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केल्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. शुबमन गिल (०), चेतेश्वर पुजारा (२१), विराट कोहली (०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १६२ धावांची भागीदारी केली. रोहित दीडशतक (१६१) ठोकून तर अजिंक्य अर्धशतक (६७) झळकावून माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकी (५८) खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. पंतच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लीचने २ तर कर्णधार रूटने १ बळी घेतला.