पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले पूजा चव्हाणच्या मृत्यूचे कारण


पुणे – राज्यातील राजकारण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चांगलेच तापलं आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीतील सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सगळ्याचे कान घटनेच्या घडामोडींकडे लागल्याचे दिसत आहे. हा विषय राजकीय वर्तुळात ज्वलंत बनत असल्याचे चित्र असून, या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. त्यातच आता पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून, तिचा मृत्यू कशामुळे झाला? याच कारण समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलवून घेतले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी सविस्तर माहिती घेतली.

डोक्याला मार लागून पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असल्याचे दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितले आहे. याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले. ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत ती राहत होती. पण तिने ७ फेब्रुवारीला तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. भावासोबत पुण्यात स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती राहत होती. तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून तिने आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे. या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख भाजपकडून करण्यात आला असून, भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झालेल्या आहेत.