आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर भडकले तेजप्रताप यादव


पाटना – तेजप्रताप यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी, ‘आझादी पत्र’ अभियान सुरू केले आहे. तेजप्रताप यादव यांनी या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) आपल्याच पक्षाच्या (राजद) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांची कानउघडणी केल्याचे समोर आले आहे.

माझ्या वडिलांची प्रकृती अशाप्रकारच्या लोकांमुळेच बिघडली आहे. पक्षाला हीच लोक कमकुवत करत असल्याचा आरोप तेजप्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यावर केला आहे. यावेळी राजदच्या कार्यालयात बराच गोंधळ झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

तेजप्रताप यावेळी म्हणाले, मी कुणाला घाबरत नाही, जे होते ते थेट तोंडावर बोलतो. पक्षाच्या कार्यालयात मी पोहचलो पण जगदानंद सिंह त्यांच्याच कक्षात बसून होते. त्यांनी आझादी पत्र देखील लिहिले नाही. माझ्या वडिलांची प्रकृती खराब होण्यामागे अशा प्रकारचीच लोक कारणीभूत आहेत. तसेच, जगदानंद यांनी यावर म्हटले की, याबाबत मला काहीच माहिती नाही, जर असे काही असेल तर हा घरातील मुद्दा आहे, तो आम्ही सोडवू. तेजप्रताप यांनी राष्ट्रपतींकडे देखील लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेची मागणी केलेली आहे. याशिवाय, बिहारमधील जनतेला देखील या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.