‘असा’ विक्रम करणारा रोहित शर्मा जगातील पहिलाच क्रिकेटपटू


चेन्नई – इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. स्वस्तात शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे भरवशाचे फलंदाज माघारी परतले. पण काही दिवसांपासून सुर हरवलेल्या रोहित शर्माला आज सूर गवसला. दुसऱ्या कसोटीत रोहितने टीकाकारांना दमदार प्रत्युत्तर दिले. रोहितने गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजांचाच समाचार घेतला. त्याने १६१ धावांची दमदार खेळी करत क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला विक्रम आपल्या नावे केला.

नाणेफेक जिंकल्यावर भारताकडून सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. शून्यावर गिल माघारी परतला. पण रोहितने दमदार खेळ सुरू ठेवला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. अर्धशतकी या दोघांनी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने शतकी मजल मारली. त्याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला.

२३१ चेंडूत रोहितने धडाकेबाज १६१ धावा केल्या. १८ चौकार आणि २ षटकारांचा त्याच्या खेळीत समावेश होता. रोहितने घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत जगात दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन या यादीत ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ एवढी आहे. फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळताना रोहितचा मोईन अलीने सीमारेषेवर झेल घेतला.