पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राणे बंधू आक्रमक


मुंबई – पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अजूनच तापले. भाजपने या प्रकरणावरुन शिवसेनेला घेरायला सुरूवात केली आहे. भाजप नेते निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेवर जोरदार टीका केली.


यासंदर्भात नितेश राणे यांनी एक पोस्ट करुन शक्ती कायद्याचा उल्लेख करत, जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?’, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला.


दरम्यान, शिवसेनेवर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनीदेखील टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारमधील एक मंत्री पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केले आहे, कुठेतरी वाचण्यात आले, पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचे असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर असल्याचे निलेश राणे म्हणाले.