पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे ; पंकजा मुंडेंची मागणी


मुंबई – शिवसेनेच्या एका मंत्र्याचा पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येत हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अजूनच तापले. बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.


सोशल मीडियावर एक पोस्ट करुन पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.

भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघत आहेत, त्यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे चित्रा वाघ म्हणाल्या.