चेन्नईची खेळपट्टी कसोटी सामन्याच्या लायक नाही; संजय मांजरेकर


चेन्नई : भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील चेन्नईच्या खेळपट्टीवरुन जोरदार आक्षेप नोंदवला जात आहे. चेन्नईच्या खेळपट्टीला इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन, इयान बेल आणि भारताचे माजी फलंदाज संजय मांजेरकर यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. चेन्नईच्या खेळपट्टीला वॉन यांनी तर सागरी किनारा असा उल्लेख करत खिल्ली उडवली आहे. तर संजय मांजेरकर यांनी खेळपट्टी अतिशय फालतू आणि कसोटी क्रिकेटच्या लायकीची नसल्याचे म्हटले आहे.

चेन्नईतच भारत आणि इंग्लंड दरम्यानचे पहिले दोन कसोटी सामने खेळविण्यात येत आहेत. गोलंदाजांना पहिल्या कसोटीत खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत अजिबात मदत मिळाली नाही. त्यानंतर शेवटच्या तीन दिवसांमध्ये खेळपट्टीचा नूरच पालटला होता. त्यामुळे गोलंदाजांना खूप चांगली मदत मिळाली होती. तर दुसरीकडे आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत याच खेळपट्टीवर पहिल्याच दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळताना पाहायला मिळत आहे. चेंडू पहिल्याच दिवशी चांगलेच वळताना पाहायला मिळाले.

खेळपट्टीच्याअजब कारभाराबाबत संजय मांजरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. काही कडक शब्दांत मी व्यक्त झालो, मग मला सोशल मीडियात ट्रोल केले जाते. पण कसोटी खेळायच्या लायकीचीच ही खेळपट्टी नाही. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजीची अपेक्षा असते, तेव्हा त्या दर्जाची खेळपट्टी देखील तयार करायला हवी. पहिल्याच दिवसाचा अवघ्या अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर खेळपट्टीला चिरा पडत असतील तर हे चुकीचे आहे. या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणता येणार नाही. अतिशय फालतू खेळपट्टी तयार करण्यात आल्याचे संजय मांजरेकर म्हणाले.