नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर


नवी दिल्ली – कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बुधवारी लोकसभेत बोलताना आज अचानक शरद पवार उलट बोलत असल्याची अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. यावेळी सभागृहात खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान सुप्रिया सुळेंनी मोदींनी केलेल्या या टीकेला उत्तर दिले आहे.

आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर मोदींनी टीका केली. त्यांना उभे राहून मी थांबवू शकत होते, पण ही आमची संस्कृती नाही. मला काही कागदपत्रे, तथ्य समोर मांडायचे आहे. भाजप सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. पण यावेळी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमलबजावणी केली जावी हे त्यांनी वाचले नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

यु-टर्न हा शब्द मोदींनी वापरल्यामुळे या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल मला सांगायचे आहे. जीएसटी मनमोहन सिंग सरकारने आणले होते, तेव्हा याला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता. आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयके आम्ही आणली. आमचा बदल झाला पाहिजे यावर विश्वास आहे. ही विधेयके जेव्हा आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, त्यांचे मत मागवूनच कायदे करण्यात आले. कोरोना संकटात नोकरी गेलेल्यांना मनरेगामुळे रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नसल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

इंटेंट आणि कंटेंट असा उल्लेख पंतप्रधानांनी केला. त्यांनी केले तर इंटेट आणि कंटेंट आणि आम्ही केले तर यु-टर्न….हे थोडे चुकीचे आहे. त्यातही खासकरुन एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून येणे, अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस शरद पवारांनी केली होती. या सरकारने तोच मार्ग का निवडला नाही. हे पत्र जर सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, तर मग शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झाले नाही. त्यांची बाजू मी मांडत नाही आहे, त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. पण मला काही तथ्य मांडायचे कारण पंतप्रधानांनी त्यांचे नाव घेतले, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

बिहारमध्ये निर्मला सीतारामन गेल्या होत्या. त्यांनी त्यावेळी मोफत लस देण्याची घोषणा केली होती. बिहारमध्ये देऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही? आम्हालाही आनंद होईल. बिहारमध्ये जर तुम्ही मोफत लसीकरणाला सुरुवात केली असेल तर तशी माहिती द्यावी. २६ हजार ५९७ कोटींची जीएसटी भरपाई महाराष्ट्राला मिळणे बाकी आहे. हे पैसै मिळाले तर आम्हीदेखील मोफत लसीकरण करु, असे सुप्रिया सुळे यांनी निर्मला सीतारामन यांना सांगितले.