एस्ट्राजेनेका लसीचा वापर करण्याची WHO च्या तज्ञ समितीकडून शिफारस


नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे जगभरातील लोक हैरान झाले आहेत. त्यातच कोरोनाचे नवे प्रकार देखील आता समोर येत आहेत. कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचा शोध लागला आहे. कोरोना लसीकरण देखील अनेक देशांमध्ये सुरुवात झाली आहे. यातच आता नवीन प्रकार समोर येत असलेल्या देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची शिफारस केली आहे.

एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबद्दल सांगताना डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी म्हटले आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा वापर त्या देशात देखील करावा, जिथे कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत समोर आला आहे. त्यासाठी कोणती लस वापरावी याबद्दल शंका होती.

या तज्ञ समितीच्या सल्ल्यांचा उपयोग जगभरात वैद्यकीय अधिकारी करत असतात. पण हा सल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रासाठी डब्ल्यूएचओकडून मंजूरी आहे, असे नाही. शुक्रवारी आणि सोमवारी डब्ल्यूएचओ समूहाच्या बैठकीनंतर ही मंजूरी मिळू शकते, अशी माहिती आहे. एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.