आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना राहुल गांधींची श्रद्धांजली; भाजप खासदारांकडून शेम-शेमच्या घोषणा


नवी दिल्ली – गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कृषी कायद्यांचा मुद्दा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला. भाजपा खासदार यावेळी नियम वाचून दाखवत राहुल गांधींना फक्त बजेटवर चर्चा करावी, अशी मागणी करत असताना दुसरीकडे मात्र शेती अर्थसंकल्पाचा भाग असल्याचे काँग्रेस सदस्यांनी सांगत अडथळे न आणण्याचा सल्ला दिला. सभागृहात गोंधळातच राहुल गांधींनी आपले भाषण पूर्ण केले आणि शेवटी असे काही केले ज्यावरुन पुन्हा एकदा गोंधळ झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी हे योग्य नसल्याचे सांगत राहुल गांधींना खडसावले.

आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, फक्त शेतकरी आंदोलनावर मी बोलणार आहे. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना यांनी श्रद्धांजली वाहिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटांचं मौन बाळगणार आहे. तुम्हीदेखील माझ्यासोबत उभे राहावे. यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार आपापल्या जागेवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले. ओम बिर्ला यांनी यावर नाराजी व्यक्त केली तर भाजप खासदारांनी शेम-शेम अशा घोषणा दिल्या.

हे सदन चालवण्याची मला जबाबदारी दिली आहे. तर असे काही असेल तर तुम्ही मला लेखी द्या, मी त्यासंदर्भाने विचार करुन निर्णय घेईन. हे योग्य नसल्याचे ओम बिर्ला म्हणाले.