सचिनच्या समर्थनार्थ नवनीत कौर यांची जोरदार बॅटिंग


नवी दिल्ली – #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच खवळले. पॉप स्टार गायिका रिहाना हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटला सचिनने आपल्या ट्विटमधून अप्रत्यक्षपणे उत्तरच दिले होते. सोशल मीडियावर सचिनच्या या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यासंदर्भात सचिनसह इतरही खेळाडू आणि सेलिब्रिटींनी ट्विट केले होते, या ट्विटला राजकीय वळण लागल्यामुळे सचिनसह सेलिब्रिटींवर टीका करण्यात आली. पण, या सेलिब्रिटींचे भाजप नेत्यांनी समर्थन केले.

सचिनसह इतरही सेलिब्रिटींच्या ट्विटचे समर्थन करताना, देशाची सार्वभौमत्वता आणि अखंडता याबद्दल बोलण्यात चुकीचे काय, असे म्हणत भाजप नेत्यांनी समर्थन केले होते. आता, सचिनसह सेलिब्रिटींच्या ट्विटचे अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनीही समर्थन केले आहे. नवनीत कौर सध्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. देशाचा अभिमान असलेले राष्ट्रीय नायक देशाच्या बाजूने आहेत की विरोधात. हे इतर कुणीही सिद्ध करण्याची गरज नाही. या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या ट्विटवरुन या सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत, असे नवनीत कौर यांनी म्हटले.

सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. हा प्रकार केरळमधील कोची येथे घडला होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचे भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, सचिनसह देशातील सेलिब्रिटींच्या ट्विटची राज्य सरकारच्या चौकशी करण्यावरुनही फडणवीस यांच्यासह भाजप आक्रमक झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी सरकारला भारतरत्नांची चौकशी करणे शोभत नाही, अशा शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली होती.

सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्यांबाबतच्या विधानानंतर सर्वसामान्य नागरिक आणि नेटीझन्स आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आपले क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला असले असे शरद पवारांनी सांगितले. तसेच एवढे दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसत आहेत, तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरे तर चांगले नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का एवढे महत्व का दिले जात आहे? ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होते का? आणि अशा व्यक्तीने ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारने ट्विट करायला लावणे हे बरोबर नसल्याचेही मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. तसेच कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत एवढेच लोकांचे म्हणणे असल्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेने तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा, असे राज ठाकरे म्हणाले.