केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळाले 3 लाख 5 हजार कोटी – देवेंद्र फडणवीस


मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पावरुन विरोधकांवर विधानससभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्प न वाचताच काही लोकांनी टीका केली आहे, असा टोला फडणीस यांनी विरोधकांना लगावला. फडणवीस यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 3 लाख 5 हजार 611 कोटी रूपये आले आहेत. त्याचबरोबर 1832 कोटी रुपये आरे कारशेडला मिळाले असल्याचे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला शब्द दिला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पात काहीच आले नाही, अशी ओरड काहींनी केल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पाचा मी स्वत: अभ्यास केला आणि महाराष्ट्रावर खरोखरच अन्याय झाला आहे का? याची माहिती घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन आज मी बोलत आहे. अर्थंसंकल्पातील माहिती, आकडेवारी आपल्यासमोर मांडत असल्याचेही देवेंद्र फडणीस म्हणाले.

आकडेवारीचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला ३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपये आले आहेत. राज्यातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रस्तेबांधणी आणि विकासासाठी एक लाख कोटी रुपयांपक्षाही अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून राज्यात सुमारे 10 हजार किमी पेक्षाही अधिक रस्ते बांधले जाणार आहेत.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, 3 हजार कोटी रुपये मुंबईतील पिण्याच्या पाण्यासाठीच्या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहेत. यातून घरोघरी पाणी मिळावे यासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो कारशेडलाही 1832 रुपये प्राप्त झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटी रुपयांची तरदूद करण्यात आली आहे. या तरतूदीतील तब्बल 7 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राला पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते. त्यापेक्षाही अधिक पैसे महाराष्ट्राला मिळाले आहेत, हा अगोदरच्या सरकारमधील आणि मोदी सरकारमधील फरक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.