मुंबई महानगरपालिकेविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कंगनाने घेतली मागे


मुंबई – अखेर अभिनेत्री कंगना राणावतकडून खारमधील राहत्या फ्लॅटवर केलेल्या मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडे बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी रितसर अर्ज करणार असून चार आठवड्यात कंगनाच्या अर्जावर निकाल देणे मुंबई महापालिकेसाठी बंधनकारक असणार आहे. जर कंगनाच्या विरोधात निकाल गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

कंगनाने अर्ज केल्यास महानगरपालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास त्या अनुषंगाने दोन आठवड्यांपर्यंत कार्यवाही करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश दिले. मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करून घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात कंगनाच्या वकिलांमार्फत देण्यात आली आहे. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधातील याचिका अभिनेत्री कंगनाने अखेर मागे घेतली आहे.