मी जिवंत असे पर्यंत भाजपला पश्चिम बंगालमध्ये येऊ देणार नाही – ममता बॅनर्जी


कोलकाता : पश्चिम बंगालसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये याच पार्श्वभूमीवर जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. भाजपला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे असल्याचे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुम्हाला जर राज्यात दंगली व्हाव्या असे वाटत असेल तर नक्कीच भाजपला मतदान करा. पण, ममता बॅनर्जीला तुम्ही पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भाजपला मी येथे येऊ देणार नाही. याचबरोबर, भाजप खोटी आश्वासने देत आहे. शेतकऱ्यांना पैसे देत नाही, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी काल भाजपवर निशाणा साधला होता. तसेच, राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकार प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देत असून त्यांच्यासाठी विनामूल्य पीक विम्याचीही व्यवस्था केल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत ‘भाजपने सोनार भारत नष्ट केला आहे. आता सोनार बांग्लाच्या गोष्टी करत असल्याची खरमरीत टीकाही केली होती. तसेच, देश विकायला ज्यांनी काढला, त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याअगोदर आरसा पाहायला हवा, अशी चपराकही त्यांनी भाजपाला लगावली होती.

केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केला होता. विधानसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. पण अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. राज्य सरकारला केंद्राकडून सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे असल्याचे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले होते.