पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड


पुणे : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये ईडीचे अधिकारी झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे पुण्यात मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांची ईडीकडून फेमासंबंधीच्या प्रकरणात चौकशी होत आहे. 6 वर्षांपूर्वीचे हे विदेशी चलन प्रकरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या फेऱ्यात चौकशीला सामोरे जात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला. ईडीचे पथक सकाळी साडे आठ वाजताच पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झाले. सध्या या कार्यालयात केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना थेट पुण्यात ईडीचे पथक तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वीही ईडीने अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यांची चौकशी फेमा कायद्यांतर्गत करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाने यापूर्वीही भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

ईडीने अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आले होते. पण विश्वजीत कदम यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.