अविनाश जाधवांचा राम कदमांना दे धक्का! मनसेत समर्थकांचा प्रवेश


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मोठा धक्का दिला आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या अनेक समर्थकांनी प्रवेश केला आहे. शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने मनसेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.

हा पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी पार पडला. शिवसेना आणि भाजपच्या ठाण्यासह वसई, विरार या भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. राम कदम यांच्या समर्थकांचा यात समावेश होता.

शिवसेनेला गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यात मोठे खिंडार पडले होते. शेकडो शिवसैनिकांनी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. त्याआधी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना तसेच भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षांना सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता.

शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला होता. चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरल्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

दोन दिवसांपूर्वी जुन्या नांदेडमधील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार असून, हा पक्ष मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. मनसे आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.