नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे. मोदींनी सोमवारी राज्यसभेत दिलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मोदी यांनी आपल्या भाषणात आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या, असे शेतकऱ्यांना म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत.
#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं हा हॅशटॅग ठरला देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड
हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात असल्याची टीकाही केली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेल्या या टीकेमुळे विरोधकांपासून ते शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी मोदींवर या शब्दावरुन टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. ६० हजारांहून अधिक ट्विट #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं असा हा हॅशटॅग असून या हॅशटॅगवर करण्यात आले आहेत. हा हॅशटॅग बुधवारी देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड ठरला.
आंदोलनजीवी या शब्दामधून आंदोलन करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोला लगावल्यानंतर आता आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आम्ही आंदोलक असलो तरी खोटे दावे आणि आश्वासने देणारे नसल्याचा हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनातील फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ साली भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर तत्कालीन भाजपध्यक्ष अमित शहा यांनी २०१५ साली एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पहिल्यांदा जुमला या शब्दाचा वापर केला होता. परदेशातील काळापैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील, हा निवडणुकीच्या प्रचारामधील जुमला म्हणजेच खोटे आश्वासन होते असे शहा यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानंतर विरोधकांनी अनेकदा यावरुन भाजपवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या ट्रेण्ड होत असणारा हॅशटॅगही याच शब्दाची आठवण करुन देणारा आहे.