मुंबई : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या कृषि कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन सुरु झालेले सोशल वॉर थांबायचे नाव घेताना दिसत नाही. सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.
सेलिब्रेटी कोणीही असो, त्यांच्या त्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, राष्ट्रवादी आक्रमक
सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसे असेच बोलावे वागावे व लिहावे. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला. ट्विटरवर त्यांनी हे भाष्य केले.
सेलिब्रिटींच्या ट्वीट ची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर!
'भारतरत्नांनी' पदाला साजेसं असच बोलावं वागावं व लिहावं.फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 9, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पॉप सिंगर रिहानाने पाठिंबा दिल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देतांना अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केले होते. परदेशी व्यक्तींनी बोलू नये, भारत एक आहे, देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू अशा आषयाचे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटींनी केले होते. मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्या निर्णय हा संतापजनक असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.