वडिलांचा नॉन मॅट्रिक उल्लेख करणाऱ्या विनायक राऊतांना जिथे दिसणार तिथे फटकावणार – निलेश राणे


मुंबई – भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी टीका केल्यामुळे निलेश राणे संतापले आहेत. नारायण राणेंचे शिक्षण विनायक राऊत यांनी काढल्यामुळे निलेश राणे यांनी राऊत जिथे दिसणार तिथे फटकावणार अशा शब्दांत इशारा दिला आहे. एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या दहावी नापास माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत विनायक राऊतांच्या टीकेला निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

विनायक राऊत नेहमीप्रमाणे भुंकायला बाहेर आले आहेत. विनायक राऊत सामाजिक कामासाठी कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? हा माणूस भाजपच्या लाटेत दोन वेळा निवडून आल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.


विनायक राऊत यांना निलेश राणे यांनी यावेळी आव्हान देताना म्हटले आहे की, हिंमत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा, किती मत मिळतात ते पहा. पण ते हिंमत करणार नाही. आपण लाटेत निवडून आल्याचे त्यांना माहिती आहे. यांच्यात खासदारकीचा एकही गुण नाही. सभागृहात तर अब्रूच काढत असतात. धड बोलता येत नाही, विषय माहिती नसतात. मातोश्रीचा चप्पलचोर अशी त्यांची ओळख आहे. हा मातोश्रीचा नवा थापा असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले आहेत की, विनायक राऊत तुमची वेळ जवळ आली आहे. तुमचा बंदोबस्त २०२४ मध्ये करणार. तुम्हाला कायमचा कोकणातून हाकलून देणार हे १०० टक्के सांगतो. भाषा बदलली नाही, तर जिथे दिसाल तिथे फटकावणार एवढे लक्षात ठेवा.