1 एप्रिलपासून आयकर नियमात होणार हे बदल


नवी दिल्ली : आयकरबाबत कोणतीही विशेष घोषणा देशाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. पण काही बदल टॅक्सशी संलग्न नियमात करण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून हे नवे नियम लागू करण्यात येणार असल्यामुळे करदात्यांना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. या नियमांबाबत तुम्ही जाणून घेऊन आधीच प्लॅन करु शकता. इनकम टॅक्स नियमांसह आयटीआर भरण्याबाबतही या अर्थसंकल्पात काही बदल करण्यात आले आहेत. तुम्ही जर आयटीआर भरत असाल तर तुम्हाला या नियमांबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी या अर्थसंकल्पात दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 75 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आता आयटीआर न भरण्याची मुभा देण्यात आली आहे. पण तेच नागरिक याचा लाभ घेऊ शकतात, ज्यांची कमाई पेन्शन आणि व्याजावर आहे. इनकम टॅक्स जेष्ठ नागरिकांना भरणे अनिवार्य असून बँकेकडून टॅक्स कापूनच तुम्हाला पैसे मिळतील. पण तुम्हाला आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये ईपीएफ धारकांनाही लक्ष्य केले आहे. तुम्ही जर दरवर्षी 2.5 लाख ईपीएफमध्ये जमा करत असाल तर अतिरिक्त फंडवर प्राप्तिकर लागू होणार. ईपीएफ याआधी टॅक्स फ्री होते. तसे, फार कमी लोक 2.5 लाखाहून अधिक पैसे जमा करतात. नोकरदार वर्गाचे वार्षिक उत्पन्न 21 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तरच तुमचा पीएफ हिस्सा 2.5 लाख रुपये असेल.

टीडीएस वाचवण्यासाठी जे लोक आयटीआर भरत नाहीत अशा लोकांना सरकारने आता लक्ष्य केले आहे. तुम्हीही जर असे करीत असाल तर सावध व्हा. करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्यासाठी इनकम टॅक्स अॅक्ट 1961 मध्ये सेक्शन 206AB जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अॅक्टनुसार इनकम टॅक्स रिटर्न फाईल न करणाऱ्यांचे दुप्पट टीडीएस कापले जाणार आहे.

आयटीआर करदात्यांना भरणे सोपे व्हावे यासाठी पगाराव्यतिरिक्त अन्य इनकम सोर्सची माहिती आधीच भरली जाईल. उदा. लाभांश उत्पन्न, भांडवली नफा, बँकेतील ठेवींवरील इनकम, पोस्ट ऑफिस व्याज इनकम याची माहिती आधीच भरली जाईल. आतापर्यंत करदात्यांना याचे वेगळा हिशोब करावा लागत होता. यामध्ये अनेकदा विसरण्याच्या कारणामुळे करदात्यांना त्रासदायक होत होते. पण आता अन्य इन्कम सोर्सची माहिती आधीच भरल्यामुळे ते सोपे होणार आहे.

सरकारने या अर्थसंकल्पात नवीन उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी टॅक्सची नवी योजना आणली आहे. आता सरकारने मार्च 2022 पर्यंत सुरु होणाऱ्या नविन उद्योगांसाठी टॅक्स हॉलिडे ही नवी योजना आणली आहे. नवीन उद्योजकांना या योजनेनुसार टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय नवीन उद्योगामध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी टॅक्स फ्री भांडवली नफ्यावरही मुदतवाढ देण्यात आली आहे.