शिवसेना भाजपच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन पोट भरते; आशिष शेलारांची टीका


सिंधुदुर्ग: भाजपला वैभववाडीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेत भाजपचे 7 नगरसेवक प्रवेश करत आहेत. भाजप नगरसेवक अमित शहांच्या दौऱ्यानंतर फुटल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपची वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता होती. भाजपकडे 17 पैकी 17 नगरसेवक होते. पण सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या सर्व प्रकरणावर शिवसेनेला टोला लगावला आहे.


आशिष शेलार यांनी मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय, असा खोचक टोला लगावल्यामुळे यावर आता शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर भाजपचे आमदार नितेश राणे दबाव टाकत असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला गेल्या 5 वर्षांपासून आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नितेश राणेंनी गेल्या 5 वर्षांत काही आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नाही. तसेच त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. पहिल्यांदाच नगरपरिषद ही भाजपची झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीकाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी दिली आहे.